लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील एका शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करण्यास परवानगी देत नसाल, तर उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविणार असल्याचा सूचक इशारा पत्रातून दिल्याने संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. काकोडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा पूत्र वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमुद आहे की, त्याने संग्रामपूर येथील महाराष्ट्र बँक शाखेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता; मात्र त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही. शिक्षणासाठी कर्ज मिळावे, या आशेवर त्याने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार केले. अकोला येथील बँकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांकडेही त्याने मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. शैक्षणिक कजार्साठी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे केला असता बँक प्रशासनाने अर्ज नामंजूर करीत १२ वी ला ५९.२३ टक्के गूण असल्याने शैक्षणिक कर्ज देता येणार नसल्याचे कारण दिले. त्याने बारावीनंतर मेहनत घेऊन सीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाल्याने शासनाच्या कोट्यातून बी-फार्मला प्रवेश मिळणार होता. भविष्यात शैक्षणिक कर्ज घेऊन पुढील शिक्षण करण्याच्या हेतूने त्याने डी-फार्मला प्रवेश घेतला. गत चार महिन्यांपासून महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे सतत पाठपुरावा करीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली; मात्र शेतकरी पुत्राच्या हाती शेवटी निराशाच लागली. त्यामुळे त्याने प्रशासकीय यंत्रणेला वैतागून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आत्महत्या करण्यास परवानगी मागितली, अन्यथा नक्षलवादी बनण्याचा इशारा दिला. यामुळे खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली खंत व्यक्तकेवळ शेतकरी पुत्र असल्याने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची खंत वैभवन ने पत्रातून व्यक्त केली. शासनस्तरावरून दहा दिवसात उत्तर न मिळाल्यास उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविण्याचा इशाराही पत्रामधून दिला आहे.