मुंबई : नालेसफाईच्या नावाखाली २००५ पासून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. केवळ पालिका आधिकारी आणि ठेकेदारच नव्हे तर सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीचे नेते यात सहभागी आहेत. यंदा नालेसफाईचे काम समाधानकारक झाल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका अधिकारी करत आहेत. त्यांचा दावा खोटा असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे नालेसफाईतील घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांचीही चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली. सिंचन घोटाळ्यात ज्याप्रमाणे मंत्र्यांची चौकशी झाली त्याच धर्तीवर नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी. अधिकारी आणि ठेकेदारांसह महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींची चौकशी करुन त्यांच्यावर एफआयआर दाखल करा. तसेच उद्धव ठाकरे यांचीही चौकशी व्हायला हवी. महापालिका आयुक्त भाजपाच्या इशा-यावर कामे करतात. भाजपाला खरेच नालेसफाईची चौकशी हवी असेल तर त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे, असा टोलाही निरुपम यांनी हाणला. दरम्यान, नालेसफाईतील भ्रष्टाचाराबाबत दोषींवर कारवाईची प्रक्रीया सुरू झाली आहे. काही दोषी व्यक्तींना आणि कंत्राटदारांना वाचवण्याची संजय निरूपम यांची धडपड सुरु आहे. नालेसफाईतील भ्रष्टाचार उघड करून दोषींवर कारवाई होईपर्यंत भाजपा पाठपुरावा करेल. त्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्याची गरज नाही, अशा शब्दात मुंबई भाजपा सरचिटणीस आ. योगेश सागर यांनी निरूपम यांना फटकारले.
नालेसफाईप्रकरणी ठाकरेंचीही चौकशी करा
By admin | Published: September 26, 2015 3:11 AM