ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 8 - भाजपा राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, भाजप शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाने देशातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीची संधी हुकली आहे. त्यामुळे भविष्यात ही तरुणपिढी आर्थिक विपणावस्थेमुळे स्वतःच्या पालकांचा सांभाळ करू शकणार नाही. त्यामुळे अशा पालकांच्या सोयीसाठी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोफत वृद्धाश्रम सुरू करणे ही काळाची गरज आहे, अशी टीकात्मक प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी दिली आहे.याबाबत दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, केंद्रातील भाजपा शासनाने अस्सल देशी गाईच्या वंशाचे महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांसह अन्य क्षेत्रातील नागरिकांनी देशी गायी पाळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल, वळू, भाकड गाई यांच्या कत्तलीवर आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे. त्यामुळेच अशा जनावरांच्या पालनासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.मात्र, केंद्रातील भाजप शासनाच्या खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण धोरणामुळे आता भारतातील बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. देशातील शासकीय तसेच निमशासकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये लाखोंच्या संख्येने रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्याऐवजी वयाच्या 58 व्या अथवा 60 व्या वर्षी निवृत्त झालेल्या वृद्धांना का ठराविक मानधनावर पुन्हा सेवेत घेण्याचे फर्मान काढलेले आहे. या फर्मानामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांवर गडांतर आलेले आहे.अशा परिस्थितीत हा युवकवर्ग भविष्यात त्याचे पालक वृद्ध झाल्यावर आर्थिक विपण्णावस्थेमुळे त्यांचा सांभाळ करू शकणार नाही. त्यामुळे भाजप शासनाने अशा वृद्धांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मोफत वृद्धाश्रम स्थापन करणे ही आता काळाची गरज आहे.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांसाठी "मेक अप इंडिया" , "स्टार्ट अप इंडिया" आदी योजनांचे गाजर दाखवून त्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे असे सांगत आहेत. या योजना वरकरणी खूप चांगल्या वाटतात. अपवादात्मक स्थितीत तरुण या योजनेद्वारे यशस्वी होतील. मात्र, खाऊजा धोरणामुळे सध्याच्या स्पर्धेच्या युगात बहुसंख्य तरुण अयशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. किंबहुना स्पर्धेमुळे गेल्या काही वर्षात देशी उद्योगधंदे बंद पड़त चालले आहेत. याचा विचार न झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात मोफत वृद्धाश्रम काढावे लागतील, असेही या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
त्याचबरोबर मोफत वृद्धाश्रमही सुरू करा- मोहनराव केळुसकर
By admin | Published: May 08, 2017 4:41 PM