- निळू दामले, ज्येष्ठ पत्रकारराठीला ऐश्वर्य नाही... ती भिकारीण झाली तरीही... असं माधव ज्युलियन १९१८च्या आसपास म्हणत होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांमुळं तसं झालंय, असं माधव ज्युलियनांच्या समकालीनांचं म्हणणं होतं. १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं. १९६० साली मराठी भाषिक महाराष्ट्र तयार झाला. दरवर्षी कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी भाषा दिन साजरा होतो. मराठी भाषा जागतिक आणि अभिजात करावी, असं मराठी माणसांचं म्हणणं. त्यासाठी सरकारनं साहित्य संमेलनाचं अनुदान हजारांतून कोटीवर नेलं. पारितोषिकं, बक्षिसं, बिरुदं यांची तर खैरात चाललीय.
तरीही २०२३ साली मराठी दिनानिमित्त माधवी वैद्य या विदुषी तक्रार करतात की, मराठीची दुर्दशा झालीय, कारण तिच्यावर झालेलं इंग्रजीचं आणि हिंदीचं आक्रमण. जाता जाता मराठी समाजाबद्दलचे हे आकडेही पाहावेत. दरडोई उत्पन्नाचे, जीडीपीचे आकडे असे आहेत. अमेरिका ७०,२४८ डॉलर; युके ४६,५१० डॉलर; जपान ३९,३१२ डॉलर; चीन १२,५५६ डॉलर; पाकिस्तान १५०५ डॉलर; भारत २३२० डॉलर आणि महाराष्ट्र २८०९ डॉलर. युकेचं दरडोई उत्पादन महाराष्ट्राच्या जवळजवळ २० पट आहे.
इंग्रजीत असं म्हणतात की, ५ लाख ते १० लाख शब्द आहेत. जगभरच्या ६ अब्ज लोकांमध्ये सुमारे १ अब्ज लोकं इंग्रजी बोलतात किंवा त्यांना इंग्रजी समजतं. दरवर्षी इंग्रजीमध्ये किमान १ हजार नव्या शब्दांची भर पडते. इंग्रजांवर जर्मन, रोमन, फ्रेंच इत्यादी लोकांनी आक्रमणं केली, त्यांच्यावर आपापली भाषा लादली. सोळाव्या शतकानंतर इंग्रज इतरांवर आक्रमणं करू लागला, जिथं गेला तिथं त्यानं आपली भाषा लोकांवर लादली. इंग्रज जिथं गेला तिथलेही शब्द-व्यवहार त्यानं भाषेत गोवले.
परकीय सत्ता असताना, स्वतंत्र असताना आणि परक्यांवर राज्य करताना इंग्रजी भाषेचा विकास झाला, ती भाषा टिकली. जग विकसित होतं, दर दिवशी जगात काहीतरी नवं घडतं. ते नवं आत्मसात केलं की, त्या नव्याभोवती शब्द तयार होतात आणि भाषेत शिरतात. या खटाटोपात काही जुने शब्द कोषात राहतात पण व्यवहारातून नाहीसे होतात. जगाशी आणि काळाशी जुळवून घेतात त्यांची भाषा समृद्ध होते.
मराठी माणूस समृद्ध झाला तर भाषा समृद्ध होण्याची शक्यता वाढेल. समृद्धी आणत असताना भाषा मोकळी ठेवली, खिडक्या-दारं उघडी ठेवली तर घरातली भाषा सतत ताजीतवानी राहील. हिंदी प्रदेश समृद्ध झाला की नाही माहीत नाही, पण हिंदी चित्रपटसृष्टीमुळं हिंदी भाषा समृद्ध झाली. दक्षिण भारतातच नव्हे तर जगभर पसरली. हिंदी सिनेमानं हिंदी भाषाही मोठी केली. हिंदी भाषेत भारतभरातून नवे शब्द आले, चित्रपटांत नवे सूर आणि ताल आले.
मराठीत इतर जातीतला शब्द आला तरी लोक नाकं मुरडतात. गरीब, झोपडपट्टीतल्या माणसानं ‘पगार भेटला’ म्हटलं की प्रस्थापित मराठी ढुढ्ढाचार्य वैतागतात. घरच्या नोकरानं ‘कल्टी मारली’ की प्रस्थापित घरमालक मराठी भाषेची चिंता करू लागतो. ‘लोचा’ झाला की ज्ञानेश्वर, मोरोपंतांना काय वाटेल, याची चर्चा मराठीत सुरू होते.सोवळं हा मराठीचा प्रॉब्लेम आहे. सोवळं म्हणजे काय हे मराठी माणसाला सांगायला नको, ते कसं येतं, कुठून येतं, कोणात येतं ते मराठी माणसाला माहीत आहे.इंग्रजांनी सोवळंओवळं पाळलं नाही. मराठी भाषा दिनानिमित्त एवढं पुरे.
इंग्रजांवर जर्मन, रोमन, फ्रेंच आदींनी आपली भाषा लादली. सोळाव्या शतकानंतर इंग्रज इतरांवर आक्रमणं करू लागले, त्यांनीही आपली भाषा लोकांवर लादली. पण तिथले शब्दही भाषेत गोवले. त्यामुळे ही भाषा प्रवाही राहिली. जगाशी आणि काळाशी जुळवून घेतात त्यांची भाषा समृद्ध होते. हिंदी प्रदेश समृद्ध झाला की नाही माहीत नाही, पण हिंदी चित्रपटसृष्टीमुळं हिंदी भाषा समृद्ध झाली. मराठी भाषाही मोकळी ठेवली, तर ती सतत ताजीतवानी राहील. सोवळं हा मराठीचा प्रॉब्लेम आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त...