परतवाडा, दि. 13- राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. परंतु माता-बालमृत्यू आणि कुपोषणाचा सामना करणाऱ्या मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात पोषण आहार बंदमुळे कुपोषणात वाढ होण्याची शक्यता असल्याने पोषण आहार पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो.
राज्यात सोमवारपासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू झाल्यापासून म्हणजे मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यासह विशेषत: मेळघाटात २० हजारांवर आदिवासी मुले व स्तनदा आणि गर्भवती मातांना दररोज दिला जाणारा पोषण आहार बंद झाला आहे. पूरक पोषण आहाराअभावी बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मेळघाटाची परिस्थिती वेगळी आहे. येथे पोषण आहार वितरण बंद राहिल्यास कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांमध्ये अडसर येऊ शकतो. कुपोषणात वाढ होऊन कुपोषित मुले कुपोषणाच्या तिस-या व चौथ्या श्रेणीत जाऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता, मेळघाटाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी राज्यशासनासह जिल्हा प्रशासनाला विशेष दखल घेण्याची गरज आहे.
जिल्हास्तरावरही चर्चा अंगणवाडीतील सेवा या माता आणि बालकांच्या आहार आणि आरोग्याशी संबंधित असल्याने त्या अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे यासेवा पुरविणे अंगणवाडी सेविका मदतनिसांवर बंधनकारक आहे. म्हणूनच राज्य पातळीवर याबाबत सकारात्मक पावले उचलली जात असून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तर जिल्हा पातळीवरील संघटनेच्या नेत्यांशी पण चर्चा केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी कैलास घोडके यांनी लोकमतशी बोलताना दिली. विशेषत: मेळघाटातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे. मेळघाटातील बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहार आणि आरोग्याची अत्यावश्यक बाब म्हणून सेवा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविकांच्या सतत संपर्कात आहेत. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यातील प्रश्न मिटला नाही तरी मेळघाटात पूर्ववत आहार वितरण सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
पोषण आहाराबाबत मेळघाटचा प्रश्न गंभीर आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटनेसोबत बोलणी सुरु आहे. लवकरच बालकांना व गर्भवती आणि स्तनदा मातांना पूर्ववत पोषण आहार पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-कैलास घोडके, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, महिला, बालकल्याण विभाग, अमरावती