पनवेल : पंधराशे कोटी रुपये खर्चून उभारलेला सायन-पनवेल महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी या महामार्गाचे काम अर्धवट आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली पहावयास मिळाली. टोल वसुली करून कंपनी मोकळी होते, मात्र दुरुस्तीच्या नावाखाली सपशेल दुर्लक्ष करते. कामोठे शहरात जाणाऱ्या मार्गाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे आजही शहरातील नागरिकांना जीव मुठीत धरून विरु द्ध दिशेने जाऊन शहरात प्रवेश करावा लागतो. अशीच अवस्था कोपरा गावाजवळील मार्गावर झालेली असून सायन-पनवेल महामार्गावरून गावात जाणारा रस्ता टोल प्रशासनाने अचानक तोडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सायन-पनवेल महामार्गाची उभारणी करण्याच्या आधीपासून या कच्च्या रस्त्यावरून वसाहत व गावातील रहिवासी मार्गक्र मण करीत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी टोल प्रशासनाने हा रस्ता अचानक तोडल्याने सेक्टर १० व कोपरा गावात प्रवेश करताना मोठा वळसा घालावा लागत आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडीवर होत असून या मार्गावरून प्रवेश करणाऱ्या गाड्या कोपरा पुलाजवळून जात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको की टोल प्रशासनाने तोडला याबाबत माहिती पुढे येत नाही. मात्र दहा दिवसांपासून आहे त्या स्थितीतच रस्ता खोदून ठेवला असल्यामुळे शॉर्टकटच्या नावाखाली अनेक दुचाकीस्वार याठिकाणी रस्ता ओलांडत आहेत. खड्ड्यांतून जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे. सायन- पनवेल टोलवेजचे अधिकारी गोपाळ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता हा रस्ता टोल प्रशासनाने खोदला नसल्याची माहिती त्यांनी दिली. हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याची विनंती येथील रहिवासी किशोर नेमाडे यांनी केली आहे. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोपरा येथील पर्यायी रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2016 2:43 AM