मुंबई : धुळ्यातील दोंडाईचा औष्णिक प्रकल्पाबाबत तातडीने तोडगा निघाला नाही तर ग्राहकहिताच्या दृष्टीकोनातून येथील उपलब्ध जागेवर जास्तीत जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले.महानिर्मितीने दोंडाईचा येथे प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेचे ५ संच उभारून एकूण ३ हजार ३०० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. प्रकल्पासाठी एकूण ९६७ हेक्टरपैकी सुमारे ४७५ हेक्टर खासगी जमीन संपादन पूर्ण झाले आहे. शिवाय या प्रकल्पासाठी निम्न तापी धरणातून ८५ दशलक्ष घनमीटर इतक्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.या प्रकल्पासाठी अद्याप २०० हेक्टर इतकी जमीन संपादित झालेली नाही. तसेच दीर्घकालीन इंधन पुरवठा करारही झालेला नाही. परिणामी उर्वरित भूसंपादन व पुरेशा कोळशाची हमी आणि प्रकल्पासाठी आवश्यक पाणी या बाबींबाबत सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरु असल्याचेही महानिर्मितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मात्र वेळीच यावर तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा पर्याय समोर असल्याचे महानिर्मितीने म्हटले आहे.(प्रतिनिधी)
दोंडाईचात औष्णिकला सौरऊर्जेचाही पर्याय
By admin | Published: May 05, 2015 1:09 AM