लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांतील दुसऱ्या टप्प्याच्या खटल्यातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाच्या मृत्यूमुळे विशेष न्यायालयासह सीबीआयचे वकील व बचावपक्षाच्या वकिलांनी दु:ख व्यक्त केले. ‘गुन्हेगार असला तरी तो माणूसही होता,’ अशा शब्दांत विशेष टाडा न्यायालयाने त्याच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.मुस्तफा डोसाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती न्या. जी. ए. सानप यांना देण्यात आली. आपल्याला हे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. त्यामुळे आपण युक्तिवाद करू शकत नाही, असे सीबीआयच्या वकिलांनी न्या. सानप यांना सांगत सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब करण्याची विनंती केली. त्याचबरोबर बचावपक्षाच्या वकिलांनीही आपण युक्तिवाद करण्याच्या तयारीत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.मलाही या दुर्दैवी घटनेने धक्का बसला आहे. तुमच्यापेक्षा (बचावपक्ष आणि सीबीआय) मला त्याची अधिक काळजी आहे. (गुन्हेगार न्यायालयीन कोठडीत असल्याने न्यायालयाला त्याची काळजी घ्यावी लागते.) गुन्हेगाराबरोबरच तो एक माणूस होता, अशा शब्दांत खेद व्यक्त करत न्या. सानप यांनी पुढील सुनावणी दोन दिवसांनंतर ठेवली.१६ जून रोजी न्यायालयाने मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज खान, करीमुल्ला खान, ताहिर मर्चंट आणि रियाझ सिद्दीकी यांना बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवले. तर अब्दुल कय्युची सबळ पुराव्याअभावी सुटका केली.कटामागचा सूत्रधार - सीबीआयमुस्तफा डोसाला फाशी ठोठावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने न्यायालयाकडे मंगळवारी केली. त्यावेळी डोसा न्यायालयात उपस्थित होता. बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांपैकी डोसा हा एक होता. कट अमलात आणताना त्याची जबाबदारी मोठी होती. बॉम्बस्फोटाचा कट अंमलात आणण्यासाठी चार पथके नेमण्यात आली होती, त्यातील एका पथकाचा म्होरक्या डोसा होता. ते नसते (डोसा व अन्य फरार आरोपी) तर हा गुन्हा कधीच घडला नसता, असे सीबीआयच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले.आग्रीपाडा येथील अकसद इमारतीच्या सातव्या आणि तिसऱ्या मजल्यावर मुस्तफाचे कुटुंबीय राहतात. पत्नी सादिया, तीन मुले- शाहनवाज (३०), शिबाज (२९), अवेज (२७) आणि दोन मुली- शेरीज (२०), शाजिया (२३) अशी त्याच्या कुटुंबीयांची नावे आहेत. यापैकी शाहनवाज आणि शिबाजचा विवाह झाला आहे.मरिन ड्राइव्ह येथील बडा कब्रस्तानमध्ये उशिराने मुस्तफा डोसावर दफनविधी करण्यात येणार असल्याचे समजते.
गुन्हेगार असला तरी तो माणूसच होता!
By admin | Published: June 29, 2017 1:45 AM