Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 04:40 PM2024-06-17T16:40:28+5:302024-06-17T17:00:54+5:30
पवार कुटुंबात आता तीन खासदार (एक लोकसभा आणि दोन राज्यसभा) आणि दोन आमदार (एक उपमुख्यमंत्री, एक आमदार) अशा चक्क पाच जागा आहेत. एकाच कुटुंबात ही खिरापत वाटली गेल्याने पवारांवर घराणेशाहीची टीका होऊ लागली आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका करत असताना दुसरीकडे घराणेशहांनाच उमेदवारी, खासदारकी दिली जात आहे. मोदींनी पवार कुटुंबावर घराणेशाहीची टीका केली होती. याच पवार कुटुंबात आता तीन खासदार (एक लोकसभा आणि दोन राज्यसभा) आणि दोन आमदार (एक उपमुख्यमंत्री, एक आमदार) अशा चक्क पाच जागा आहेत. एकाच कुटुंबात ही खिरापत वाटली गेल्याने पवारांवर घराणेशाहीची टीका होऊ लागली आहे. अशातच रोहित पवारांनी जबरदस्त तर्क देत घराण्याच्या किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला आहे.
रोहित पवारांनी ही घराणेशाही नसल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी शरद पवारांचे कुटुंब वेगळे आणि अजित पवारांचे वेगळे असा तर्क दिला आहे. शरद पवार यांनी सत्तेत असताना सुप्रिया सुळेंना कधीही खासदार केले नाही. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाची संधी दिली होती, असे रोहित पवार म्हणाले.
यातही रोहित यांनी अजित पवारांवर टीका केली. अजित पवार यांचा त्यांच्याच पक्षातील लोकांवर विश्वास नाहीय. यामुळे त्यांनी घरातच पुन्हा खासदारकी दिली आहे, असा आरोप रोहित यांनी केला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मला पद दिले नव्हते. सुळे यांनाही अनेक वर्षे पद दिले नव्हते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा ताबा घेतल्या घेतल्याच घरात खासदारकी दिली. त्यांचा दुसऱ्यांवर विश्वास नाही, असे आता त्यांच्याच पक्षातील नेते कुजबुज करत असल्याचा आरोप रोहित यांनी केला.
त्यांच्या पक्षात अनेक गोष्टी साध्या राहिलेल्या नाहीत. अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशन होऊद्या, फंड मिळुद्या मग अनेक आमदार निर्णय घेतील. ज्या लोकांनी आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नसेल, जे फार विरोधात बोलले नसतील त्यांनाच आम्ही पुन्हा परत घेणार आहोत. इतरांना आमच्या पक्षात घेणार नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.