शौकत शेख,
डहाणू- येथे आयोजिलेल्या स्वच्छता अभियानात मंगळवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सहभागी झाल्या होत्या. डहाणूच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय उपक्रम म्हणून डहाणू शहरात माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. डहाणू स्टेशन ते सागर नाका, डहाणू शहर ते थर्मल पावर रोड, ईराणी रोड, पारनाका या भागात अभियान राबवण्यात आले. यावेळी खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भरत राजपूत, सभापती चंद्रीका आंबात, जि.प.अध्यक्ष, जि.प. महीला बालविकास सभापती विनीता कोरे, जि.प.कृषी सभापती वडे यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.डहाणूच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून गावच्या विकासात कोणतेही राजकारण आड येऊ देणार नाही.आज या कार्यक्र माला उपस्थितीत असलेले खासदार, आमदार, जि.प.अध्यक्ष, पं.स.सभापती आणि पदाधिकारी हे भाजपचे असणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच हा कार्यक्र म केवळ मंचासाठी नसल्याचे सांगून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी डहाणू बाजारपेठ आणि स्टेशन परिसरातील कचरा उचलून स्वच्छता अभियानात एक तास उत्सफूर्त सहभाग दर्शविला तो पाहुन कार्यकर्ते ही अचंबित झाले. त्यानंतर स्मृती इराणी यांच्या अभियानाला डहाणूच्या जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनुपस्थित राहिल्याने नागरिकामध्ये तीव्र प्रतिक्रि या उमटल्या.