विधानसभेत आमदारांच्या अपात्रतेवरून सुनावणी सुरु असताना संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर टीका केली आहे. तसेच अजित पवार आणि शिंदे गटातले बहुतांश आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करतील, असा दावाही राऊतांनी केला आहे.
दिल्लीमधून आदेश येतात, तर ते दिल्लीलाच जाणार. संविधाना नुसार निर्णय दिला असता तर हे सगळे आमदार घरी बसले असते. दिल्लीचे आदेश काय येतात, त्यावर हे सुनावणी घेणार. विधानसभा अध्यक्षांचा आम्ही नेहमी आदर केलाय पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? ते स्वत: कायदा आणि संविधान मानतात का? असा सवाल करत पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे हा कायदा आहे, परंतू त्यावर निर्णय घेतला जात नाहीय, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
अजित पवार आणि शिंदे गटातले बहुतांश आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करतील. भाजपाने त्यांना उमेदवारी दिली तर कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील. ज्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोडले त्यातील अनेकांचे पराभव होणार आहेत. राज्यातील जनतेची मी मानसिकता पाहत आहे, नागरिक गद्दारांना स्वीकारणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला.
याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजस्थान दौऱ्यावर देखील राऊतांनी टोला हाणला. पुढच्या वर्षी अमेरिका आणि फ्रान्समध्ये निवडणुका आहेत. शिंदे हे ताकदवर नेते आहेत, तिकडे पण त्यांचे सभा लागतील, असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला. तसेच इथे पालिका निवडणुका घायला सांगा आधी, चालले राजस्थानमध्ये प्रचार करायला, असेही राऊत म्हणाले.