- विलास गावंडे
यवतमाळ : मराठी बोला रे, मराठी शिका रे, मराठी वाचा रे, असा तगादा अमराठीच नव्हे तर, मराठी भाषिक विद्यार्थ्यांनाही लावला जातो. इंग्रजी शाळांमधून तर मराठी विषय जणू हद्दपार होत चालला आहे. गुणांचा टक्का कमी होऊ नये म्हणून, तीन भाषेच्या पर्यायातून मराठी विषय टाळला जातो. पण यवतमाळच्या एका अमराठी विद्यार्थ्यांने मराठीचा झेंडा उचलून या भाषेचा सार्थ अभिमान जपला आहे.
मराठी भाषेकडे लोकांचा ओढा कमी होत चालला आहे. या भाषेला दूर लोटले जात असल्याचे पदोपदी अनुभवायला मिळते. हिंदी भाषिक कुटुंबात तर अपवादानेच या भाषेला स्थान मिळते. आर्णी येथील असफ आरिज बेग याने मात्र मी मराठी शिकणारच असा पण करत मोठे आव्हान स्वीकारले. आठवीपर्यंत आर्णी या तालुक्याच्या ठिकाणी असफ याने मराठी भाषेत शिक्षण घेतले.
नववीत त्याने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मराठी, संस्कृत आणि हिंदी या पर्यायातून त्याने मराठी विषय निवडला. आज स्पर्धेचे युग आहे. गुणांचा टक्का कमी होऊ नये म्हणून मराठी विषय टाळला जातो. पण मराठी भक्तीचे वेढ लागलेल्या असफने हा विषय आव्हान म्हणून स्वीकारला आणि नववीत यशस्वीही झाला. बेग कुटुंबात मराठी भाषेचे वातावरण नाही.
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये त्याचा एकट्याचा ४५ मिनिटांचा वर्ग घेतला जात होता. छाया गुजर यांच्या मार्गदर्शनात असफ मराठीत तरबेज झाला. प्राचार्य डॉ.जेकब दास यांचेही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. आज तो दहावीची परीक्षा देत आहे. मराठी विषयाचा पेपर झाला. वायपीएसमधून त्याने एकट्याने या विषयाचा पेपर दिला. शाळेकडून त्याच्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली. मराठी विषयात चांगल्या गुणांनी पास होईल, असा विश्वास असफला आहे.
कुटुंबातून मिळाले प्रोत्साहन
असफ हा आर्णी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे गटनेते आरिज बेग मिर्झा यांचा चिरंजीव आहे. त्यांच्या कुटुंबातही मराठी प्रेम जपले जाते. कुटुंबातील सदस्य अधिकाधिक मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. मुलगा असफ याने मराठी विषय घेऊन शिकावे, ही कुटुंबातील सर्व सदस्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्याला प्रोत्साहन आणि मराठी शिकण्याचे बळ दिले गेले.