कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईचा शालू आज, मंगळवारी आजऱ्याचे मानसिंग व मनीषा खोराटे दाम्पत्याच्या पदरात आला. त्यांनी पाच लाख ५५ हजारांची बोली लावून शालूचा मान स्वीकारला. याक्षणी देवीचा आशीर्वाद मिळाला, अशी भावना व्यक्त करताना खोराटे यांच्या डोळ्यांत अश्रू आले. अंबाबाईला मातृभावनेतून तिरुपती देवस्थानच्यावतीने दरवर्षी शालू अर्पण केला जातो. हा शालू दसऱ्यादिवशी देवीला नेसवला जातो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने २००८ सालापासून या शालूचा लिलाव केला जातो. आज दुपारी तीन वाजता अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी समितीचे सचिव विक्रांत चव्हाण, सदस्या संगीता खाडे, बी. एन. पाटील-मुगळीकर, हिरोजी परब, प्रमोद पाटील उपस्थित होते. लिलाव प्रक्रियेत खोराटे यांच्यासह रघुनाथ चव्हाण, रवींद्र म्हाकवेकर यांनी सहभाग घेतला. यंदा आलेल्या शालूची मूळ किंमत ८६ हजार असली तरी बोलीची सुरुवात साडेचार लाखांपासून करण्यात आली.साडेचार लाखांपासून सुरू झालेल्या बोलीचा उच्चांकी दर मानसिंग खोराटे आणि रघुनाथ चव्हाण यांच्यातच लागला. अखेर मानसिंग खोराटे यांनी पाच लाख ५५ हजारांची अखेरची बोली लावून शालूचा मान मिळवला. त्यांना देवस्थान समितीच्या सदस्यांच्या हस्ते शालू आणि देवीची मूर्ती प्रदान करण्यात आली. खोराटे हे मूळचे आजरा तालुक्यातील हालेवाडी गावचे आहेत. केमिकल इंजिनिअर असलेले खोराटे २००० मध्ये कोल्हापुरातील प्रतिभानगर येथे स्थायिक झाले. ते साखरेचे व्यापारी आहेत. समितीचे सहसचिव संजय साळवी यांनी लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी व्यवस्थापक धनाजी जाधव, लिलाव प्रक्रियेसाठी नावनोंदणी केलेले आनंद हिरेमठ, नितीन पाटील, आकाश पाटील, शिवाजी पोवार उपस्थित होते.आमची अंबाबाईवर नितांत श्रद्धा आहे. आम्ही गेल्या १३ वर्षांपासून दर मंगळवार, शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी येतो. देवीला नेसवलेला शालू आपल्याला मिळावा, अशी खूप इच्छा होती. आज देवीच्याच कृपेने ती पूर्ण झाली. - मनीषा खोराटे करवीरनिवासिनी अंबाबाईच्या शालूचा लिलाव मंगळवारी मंदिरातील गरुड मंडपात झाला. यावेळी मानसिंग व मनीषा खोराटे दाम्पत्याने सर्वाधिक बोली लावून शालूचा मान मिळवला.
अंबाबाईचा शालू खोराटे दाम्पत्याच्या पदरात
By admin | Published: October 22, 2014 12:16 AM