Ambadas Danve: जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. यादरम्यान झालेल्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांमधील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. यामुळे पवार कुटुंबियांमध्येही दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र अनेकदा शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत अशी आशा व्यक्त केली आहे. यावर बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे आमचे दैवत आहेत, असं म्हटलं. मात्र यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घवघवीत विजयानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकीपणाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या राजकीय परिस्थितीत अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता शरद पवारांचे महत्त्व कळू लागले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकतेच दोन्ही गटांच्या ऐक्याचे जाहीर आवाहन करून, ही पक्ष कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची समान इच्छा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नववर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रार्थना करताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील सर्व मतभेद संपण्याची इच्छा व्यक्त केली.
याला भावनिक मुद्दा म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी, शरद पवार हे आमचे दैवत आहेत, कुटुंब एकत्र आले तर ती आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असेल, असं म्हटलं. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या या विधानावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रफुल्ल पटेल यांना संधीसाधू म्हणत टीका केली आहे.
"एका आईने ही भावना व्यक्त केली आहे यादृष्टीने त्याचा विचार करायला हवा. त्यात राजकारण आणायला नको. प्रफुल्ल पटेल हे संधीसाधू आहेत. त्यांच्याबाबत बोलायचं आणि त्यांच्याच पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या व्यक्तीला बनवायचं. ते शरद पवारांनाही समर्थन देतात आणि अजित पवारांनाही. यामध्ये आईला आणायला नको. आईच्या भावनांना राजकारणासोबत जोडायला नको हे मी समजतो," असं अंबादास दानवे म्हणाले.