आज राज्यातील अनेक वृतपत्रात शिवसेनेच्या शिंदे गटाने जाहिरात दिली आहे. या जाहिरातीला 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे', असं म्हटलं आहे. या जाहिरातीत एका सर्वेचा अहवाल दिला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पामुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे',असं या जाहिरातीत म्हटले आहे. या जाहिरातीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ठाकरे गटाचे नेते नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "54 % जनता ही तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी" म्हणत खोचक टोला लगावला आहे. "राजकारणात दोन आणि दोन चार होत नसतं. तर कधी कधी दोन-दोन सहा पण होतात. तर कधी कधी दोन आणि दोन दोनच राहतात" असं म्हणत दानवेंनी निशाणा साधला आहे.
"जसं महाराष्ट्रातील जनता भाजप शिवसेनेला 46 टक्के मत त्यांच्या बाजूनं दिल्याचे हे सांगत आहेत. त्याचबरोबर राज्यातील 54 % जनता ही त्यांच्या विरोधात असल्याचं येथे सिद्ध होतं. म्हणून तुमची ही जाहिरात खोटी आहे. जनतेच्या मनात धूळ फेकणारी आहे. तुमचं हे सर्वेक्षणच तुमच्या विरोधात आहे" असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदाचे सर्वेक्षणही दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2% जनतेला मुख्यमंत्रीपदावर पहायचे आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 % जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवली, असं यात म्हटलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.