राज्यातील राजकारणात मोठा भूकंप रविवारी झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. त्यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत वाटा मिळवला. त्यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले. शरद पवारआणिअजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत? याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे. याच दरम्यान ठाकरे गटाने एक सवाल केला आहे. "आमदारनिहाय १०० कोटी निधीची डिल; पडद्यामागील कलाकार बोलतील का?" असं विचारलं आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच.... पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?" असं अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे, असे अनिल पाटील म्हणाले. सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही. त्यामुळे याठिकाणी आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायालयीन लढाईला सामोरे जाऊ, असेही अनिल पाटील यांनी सांगितले. याचबरोबर, 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.