सावंतवाडी, दि. 13 - जगाच्या नकाशावर आलेल्या निसर्ग संपदेनं परिपूर्ण असलेल्या आंबोलीचा धबधबा सीमेच्या वादात अडकला आहे. आंबोली आणि पारपोली या दोन्ही ग्रामपंचायतींनी आंबोली धबधब्यावर दावा केला आहे. आंबोली हा धबधबा पारपोली गावाच्या हद्दीत येत असल्यानं त्याच्या नामकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. आंबोलीच्या नामकरणासाठी पारपोलीवासीय आणि वनविभागामध्ये गुप्त बैठकाही सुरू आहेत. आंबोलीचं नामकरण करण्याला आंबोलीवासीयांचा विरोध आहे. आंबोली घाट व वर्षा पर्यटनाला मुख्य आंबोलीच्या धबधब्यामुळे वरदान लाभलं आहे. या धबधब्यावर दिवसाकाठी हजारो पर्यटक येतात; निसर्ग संपदेनं तृप्त असलेला हा धबधबा सीमेच्या वादात फसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीचा विकास व्हावा, यासाठी आंबोली धबधब्याला भेट देणार्या पर्यटकांकडून प्रत्येकी 10 रुपये पर्यटन कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली. आतापर्यंत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून समितीकडे दहा लाखांहून अधिकची रक्कम कराच्या स्वरुपात गोळा झालेली आहे. येत्या काळात या रकमेत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.कराच्या माध्यमातून मिळणारे लाखो रुपये हाच कळीचा मुद्दा ठरला असून, पारपोली ग्रामपंचायतीला धबधब्याचं नामकरण करायचं आहे. पर्यटनातून मिळणा-या कराच्या उत्पन्नावर आता पारपोली आणि आंबोली या दोन्ही ग्रामपंचायतींचा डोळा आहे. त्यामुळे ते उत्पन्न आपल्यालाच मिळावे, यासाठी दोन्ही ग्रामपंचायती प्रयत्नशील आहेत. वनविभाग आणि महसूल विभागाने कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार आंबोली धबधबा हा पारपोली गावच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याची देखरेख आणि मिळणारे उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे, अशी मागणी पारपोली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याचे नामकरण ‘शिवमुख धबधबा पारपोली’ असे करण्याचाही पारपोली ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. त्यासाठी ग्रामस्थ आणि वनविभागाच्या गोपनीय बैठका होतायत.आचारसंहितेमुळे त्यांना उघड कोणतीही भूमिका घेता येत नाही. नामकरणाला आंबोली आणि चौकुळ ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच इतकी वर्षे हा आंबोली धबधबा या नावानेच ओळखला जात असल्यामुळे काहीही झाले तरी आम्ही त्याचे नाव बदलण्यास देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय. मात्र दोन गावांत वाद लावण्यासाठी वन विभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोपही आंबोली चौकूळ ग्रामस्थांनी केला आहे. विद्यमान उपसरपंच धबधब्याच्या ठिकाणी करवसुली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात बसतात ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे असा प्रकार करू शकत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आंबोली धबधब्याच्या नामकरणाच्या हालचाली, धबधबा अडकला सीमावादात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 7:42 PM