ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 3 - चड्डी टोळीतील ८ ते १० चोरट्यांनी हरिशांती कॉलनीत दरोडा टाकून रात्रभर हैदोस घातला. येथील चार ठिकाणी दरोडा टाकून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ५ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारच्या मध्यरात्री १.४५ वाजतादरम्यान घडली. यामध्ये दोन ठिकाणी दरोडा अयशस्वी ठरला आहे.
या घटनेमुळे अंबानगरीत एकच खळबळ उडाली असून या कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहेत. फिर्यादी रामचंद्र मुलचंदाणी (२३, रा. हरिशांती कॉलनी) यांच्याकडे तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चड्डी टोळीने प्रथम दरोडा टाकला. त्यांना या भामट्यांनी दोन थापडाही लगावल्या, तेथेच बांधून ठेवले. एकटेच घरी असल्याने दागिने व रोख ३० हजार व एक मोबाईल चड्डी टोळीने लुटून नेला.
यांनतर बाजूलाच असलेल्या सुधीर रामकृष्ण वडतकर (४०) यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला. त्यांच्या घरात पत्नी व लहान मुलगा होता. दार ठोकल्याने सधीर वडतकर यांनी दार उघडताच त्यांना पकडले व मारण्याचा धाक दाखवून पैसे काढून द्या, अन्यथा आम्ही मारहाण करून, अशी धमकी दिली. त्यांच्या घरातून ६० हजार रुपये लुटून नेले. त्यानंतर येथील करण आर. गंगन यांच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यांची आई-वडील, मुलगी व आजी घरात होती. पण घरातील ग्रील चोरट्यांना काढता न आल्याने दरोडा फसला. यानंतर ते भामटे एवढयावरच थांबले नाही, तर त्यांनी बाजूला असलेल्या आकाश जितेंद्र कारुंश (२३) यांच्या घरी दरोडा टाकला. त्यांच्या घरातील सदस्य आई- वडील मारण्याच्या भीतीने पलंगाखाली लपवून बसले. चोरट्यांनी घरातील साहित्य फेकफाक केले. पण घरात त्यांना सोन्याचांदीचे दागिने व पैसे मिळाले नाही. हा प्रकार हरिशांत कॉलनीत तासभर सुरू होता. रात्री २.४५ वाजतादरम्यान चड्डी टोळीतील चोरटे पडून गेले. यानंतर लगेच या ठिकाणी बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनाम्यासाठी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व स्थानिक गुन्हे शाखेलाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी बघायाची गर्दी जमली होती.