औरंगाबादच्या राजकारणात अखेर अंबादास दानवेंचा उदय !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:00 AM2019-08-22T11:00:31+5:302019-08-22T11:11:37+5:30
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द औरंगाबादच्या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून प्रमाण मानला जायचा. परंतु, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अपसुकच अंबादास दानवे यांचे महत्त्व वाढणार आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत तब्बल चार वेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादमधून पराभव झाल्यामुळे मराठवाड्यातून शिवसेनेची पिछेहाट तर सुरू झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. परंतु, अशा परिस्थितीत शिवसेनेचे दुसऱ्या फळीतील नेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजय मिळाला. या विजयामुळे अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर दानवे यांचा अखेर औरंगाबादच्या राजकारणात उदय झाला.
मागील कित्येक वर्षांपासून औरंगाबादच्या राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या अंबादास दानवे यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. तोही अशा वेळी जेव्हा जिल्ह्यातील मातब्बर नेते चंद्रकांत खैरे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहे. दानवे यांच्या विजयासाठी युतीने पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.
औरंगाबाद-जालना विधान परिषद जागेसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव झाला. गेल्यावेळी काँग्रेसकडे असलेली ही जागा शिवसेनेने परत आपल्याकडे खेचून आणली. वास्तविक पाहता औरंगाबाद आणि जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेची काँग्रेस युती होती. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रोष होता. अशा स्थितीत दानवे यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता होती. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून व्हीप जारी केल्यामुळे भाजपची मते दानवे यांनाच मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात खैरे यांचा एकहाती अंमल होता. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना राज्य पातळीवर चमकण्यासाठी फारशी संधी मिळाली नाही. मात्र खैरे यांच्याविषयी असलेली नाराजी आणि त्यांचा झालेला पराभव यामुळे शिवसेना नेतृत्वाने औरंगाबादमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली. केवळ संधी न देता दानवे यांच्या विजयासाठी युतीची ताकद उभी केली. तर शिवसेनेचा कायम विरोध करणाऱ्या एमआयएमने देखील दानवे यांना मदत केली. यावरून दानवे यांचे सर्वच पक्षांसोबत असलेले संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.
खैरेंची जागा घेणार
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द औरंगाबादच्या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून प्रमाण मानला जायचा. परंतु, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अपसुकच अंबादास दानवे यांचे महत्त्व वाढणार आहे. त्यातच मराठा समाजातील असल्यामुळे दानवे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. एकूणच औरंगाबादममध्ये खैरे यांच्यानंतर दानवेंकडे शिवसेनेचे नेतृत्व म्हणून पाहिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.