अकोला : ‘वंचित’ नावाने आघाडी स्थापन करून ते रिंगणात असले तरी वंचितांना न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कोणतीही नीती नाही, धोरण नाही. केवळ मोदींना शिव्या देणे हाच त्यांचा एकमेव उद्योग आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अकोला येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, वंचित घटकांना एकत्र करीत त्यांनी आघाडी केली असली तरी या वंचितांना न्याय देण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये आहे. किंबहुना गेल्या पाच वर्षांत वंचितांना न्याय देण्याचे काम मोदींनीच केल्याचा दावा त्यांनी केला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कोणतीही नीती नाही, कोणतेही धोरण नाही. अकोला जिल्हा परिषदेत गेल्या २५ वर्षांत त्यांच्याच हातात सत्ता आहे. या जिल्हा परिषदेचे त्यांनी वाटोळे केले, असे त्यांनी सांगितले.