ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - इंदू मिलमधील बहुप्रतिक्षित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेते या सोहळ्याला गैरहजर असल्याने भाजपा - शिवसेनेतील धूसफुस चव्हाट्यावर आली आहे.
रविवारी उरणमधील चौथे कंटेनर टर्मिनल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबईत आले आहेत. आंबेडकरवादी नेते प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आदींना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले गेले होते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचे आमंत्रण उशीरा दिल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. मोदी मुंबईत असताना उद्धव ठाकरे बीड दौ-यावर होते. शिवसेनेचे मंत्री व आमदारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आल्याने या कार्यक्रमाकडे शिवसेना नेत्यांनी पाठ फिरवली होती.