आंबेडकरांची काँग्रेसला १४४ जागांची ऑफर; एमआयएमच्या प्रस्तावाचं काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:50 PM2019-08-20T16:50:53+5:302019-08-20T16:51:18+5:30
लोकसभेला सोलापूर आणि अकोला मतदार संघातून आपल्याला मुस्लीम मते मिळाली नसल्याची तक्रार आधीच आंबेडकरांनी केली होती. यामुळे वंचितमध्ये एमआयएमचे स्थान काय, अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीपूर्वी मुस्लीम आणि दलित मतांना एकत्र करण्याचा प्रयोग करणारे भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असुद्दीन ओवेसी यांच्यातील विधानसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागा वाटपासंदर्भात आंबेडकरांनी लवकर निर्णय घ्यावा, असं एमआयएमकडून सुचविण्यात आले आहे. त्यातच आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर देऊ केली आहे. त्यामुळे वंचितमधील एमआयएमला किती जागा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनेक दिवसांपासून जागा वाटपासंदर्भात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. वंचितने सुरुवातीला काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली होती. या ऑफरवरून आंबेडकरांना काँग्रेससोबत युती करायचीच नाही, असं मानले जात होते. परंतु, अडथळे दूर करत काँग्रेस नेत्यांनी वंचितला आघाडीत घेण्यासाठी पुढाकार घेतला.
काँग्रेससोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच वंचितकडून राज्यभरातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरुच होता. त्याचवेळी एमआयएमने देखील आंबेडकरांकडे विधानसभेला ९८ जागांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आंबेडकरांनी अद्याप काहीही उत्तर दिले नाही. याउलट आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची अर्थात अर्ध्या जागांची ऑफर दिली. यावर काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. परंतु, यामुळे वंचित आणि एमआयएमच्या युतीचा प्रश्न उपस्थित होत आहे.
आंबेडकरांनी काँग्रेसला निम्म्या जागांची ऑफर दिल्यानंतर वंचित आणि एमआयएममध्ये जागा वाटप कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच लोकसभेला सोलापूर आणि अकोला मतदार संघातून आपल्याला मुस्लीम मते मिळाली नसल्याची तक्रार आधीच आंबेडकरांनी केली होती. यामुळे वंचितमध्ये एमआयएमचे स्थान काय, अशा प्रश्न उपस्थित होत आहे.