महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, बौद्धजन पंचायत समिती तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर महाडमध्ये शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. चोवीस तासांत हल्लेखोरांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी झालेल्या सभेत देण्यात आला.आनंदराज आंबेडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर मंगळवारी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी चवदार तळे येथील डॉ. आंबेडकर सभागृहात महाड, पोलादपूर तालुक्यांतील विविध दलित संघटनांची सभा आयोजित करण्यात आली होती. या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी १९ जून रोजी महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर आंबेडकरी संघटनांचा महामोर्चा नेण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते मुकुंद पाटणे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करताना या हल्ल्याची घटना निंदनीय असल्याचे सांगितले. तुळशीराम जाधव, केशव हाटे, दीपक गायक वाड, बिपीन साळवे, सुहास मोरे, अनंत तांबे आदी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी दलितमित्र बाबाजी साळवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सत्यवान महाडिक, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत चव्हाण, रिपाइंचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे, सचिन धोत्रे तसेच तालुक्यांतील आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेनंतर सर्व नेत्यांनी शहर पोलीसांत जाऊन पो. नि. दिलीप शिंदे यांना हल्लेखोरांना अद्यापही अटक का करण्यात आली नाही, असा जाब विचारला. याबाबतची कार्यवाही सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. या हल्ल्यामागील सूत्रधाराचाही पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी महाड शिवसेना आमदार भरत गोगावले यांचा मुलगा युवा सेनेचा अधिकारी विकास गोगावले यांच्यासह महेंद्र घारे, नीलेश हाटे, गणेश साळुंखे, लल्ला रत्नपारखी, महेंद्र वानखेडे आदी पंधरा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
महाड प्रांत कार्यालयावर आंबेडकरी संघटनांचा महामोर्चा
By admin | Published: June 18, 2015 2:40 AM