ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी साहित्यक्षेत्रालादेखील नवी दिशा दिली. बाबासाहेबांची विचारसंपदा मौलिक आहे. त्यांच्या विचारांचा आणखी प्रचार-प्रसार व्हावा यासाठी राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी उघडण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षाच्या निमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आपल्या देशात महापुरुषांचे विविध जातीधर्मातील लोकांनी विभाजन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार एका विशिष्ट जातीधर्मापुरता मर्यादित नव्हता. त्यांचे विचार हे सर्वांसाठी होते. परंतु काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा बाजार करत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे, असे परखड मत बडोले यांनी व्यक्त केले. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विदर्भातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच विद्यार्थी उपस्थित होते.