पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना त्यांचे वास्तव्य असलेली वास्तू मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य सरकारच्या ताब्यात मिळणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले, कांबळे आणि विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यासंदर्भात मागील महिन्यात लंडनला गेले होते. त्यात भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या मदतीने डॉ़ आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाल्याचे कांबळे यांनी सांगितले. संबंधित घराचे मालक त्याचा लिलाव करणार होते. त्यामुळे लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या मदतीने आम्ही मागील महिन्यात घरमालकाची भेट घेऊन लिलाव न करण्याची विनंती केली. हे घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असल्याचे त्यांना सांगितले. या व्यवहाराचे तारण म्हणून ३.१० कोटी रुपये आम्ही जमा केल्याचे कांबळे यांनी सांगितले. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात बाबासाहेबांनी या घरात वास्तव्य केले होते. संबंधित वास्तूची किंमत सुमारे ३५ ते ४० कोटी रुपये आहे. १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’ने दरवर्षी राज्यातील २ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतल्याचे कांबळे यांनी सांगितले. आतापर्यंत सामाजिक न्याय विभाग राज्यातील २० विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत होता. यापुढे १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. लंडनमधील निवासस्थान ताब्यात आल्यानंतर एका मजल्यावर बाबासाहेबांचे स्मारक, दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, तिसऱ्या मजल्यावर लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सने शिष्यवृत्ती दिलेल्या २ विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. (प्रतिनिधी)
आंबेडकरांचे निवासस्थान महिनाअखेर ताब्यात
By admin | Published: May 05, 2015 1:20 AM