NCP Dilip Walse Patil ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि आंबेगावमधून आठव्यांदा विधानसभेत दाखल झालेले दिलीप वळसे पाटील हे काही वेळापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पोहोचले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीची आज बैठक आयोजित करण्यात आल्याने या बैठकीसाठी मी आलो असल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी मी शरद पवार यांची भेट घेईन, अशी माहितीही वळसे पाटलांनी दिली.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे नंतर वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संबंध ताणले गेले. यातूनच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आंबेगावमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतून वळसे पाटलांना निवडणुकीत पराभूत करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. मात्र वळसे पाटलांचा या निवडणुकीत काठावर विजय झाला. त्यानंतर आता हे दोन्ही नेते पहिल्यांदाच आज भेटणार आहेत.
आंबेगावमधील लढतीत नेमकं काय झालं?
आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा १ हजार ५२३ मतांनी पराभव केला आहे. विधानसभेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यात चढ-उतार होत होता. शेवटच्या विसाव्या फेरीत निकाल निश्चित होऊन दिलीप वळसे पाटील १ हजार ५२३ मतांनी विजयी झाले. एकूण २ लाख २२ हजार ५१५ मतांपैकी वळसे पाटील यांना १ लाख ६ हजार ८८८ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांना १ लाख ५ हजार ३६५ मते मिळाली आहेत.