रत्नागिरी - दापोलीतील आंबेनळी दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंत - देसाई यांची बदली करण्यात आली आहे. सावंत - देसाई यांची बदली आता दापोली मत्स्य महाविद्यालयात करण्यात आली आहे. २८ जुलै रोजी सहलीला जाणारी बस दरीत कोसळून दापोली कृषी विद्यापीठाचे ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. मात्र, या भीषण अपघातात केवळ प्रकाश सावंत - देसाई आश्चर्यकारकरित्या बचावले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी संशय घेत त्यांना संशयाच्या भोवऱ्यात ओढले होते.
अपघातानंतर सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये तफावत होती. त्यामुळे इतक्या भीषण अपघातातून प्रकाश सावंत बचावले कसे, असा सवाल मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी करत प्रकाश सावंत - देसाई यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे चौकशीची मागणी केली होती. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधात मोर्चाही काढला होता. दरम्यान, दापोली कृषी विद्यापीठानेही आपला चौकशी अहवाल सादर करून प्रकाश सावंत - देसाई यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर आता पुन्हा सावंत - देसाई यांची बदली झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.