मुंबई : डिजिटल धारावी अंतर्गत तेथील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळवून देणे, उद्योजकता वाढविणे, राज्यभर २५ सिस्को नेटवर्क अकॅडमीची उभारणी, ब्रॉडबॅन्ड सुविधांची निर्मिती, नागपूर येथे स्मार्ट सिटी प्रकल्पास सहकार्य व फेटरी (जि.नागपूर) या गावात वायफाय, स्मार्ट एज्युकेशन व स्मार्ट हेल्थकेअर सुविधा उभारणे आदींसाठी सिस्को कंपनी सहकार्य करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. यावेळी त्यांनी धारावी व फेटरीतील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनमोकळा संवाद साधला. शासनाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव नेटवर्कने जोडण्याचे नियोजन असून, महाराष्ट्र हे ‘डिजीटल इंडिया’च्या अंमलबजावणीत अग्रेसर राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘सिस्को’च्या पुणे येथील प्रकल्पाचे ई-उद्घाटन यावेळी झाले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन, सिस्को सिस्टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स, सिस्को इंडियाचे अध्यक्ष दिनेश मलकानी आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा सहजपणे मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे, आता राज्यातील सर्व ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्यात येतील. त्यामुळे खेड्यातही आरोग्य व शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळतील. (विशेष प्रतिनिधी)
डिजिटल महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी योजना
By admin | Published: October 13, 2016 5:57 AM