मुंबई : लालबाग परळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नाना आंबोले, त्यांची पत्नी तेजस्विनी, शिवसेनेचे महापालिका गटनेते राहिलेले प्रभाकर शिंदे, अणुशक्तीनगरमधील नगरसेवक बबलू पांचाळ आणि त्यांच्या पत्नी अनिता यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपाच्या दादरमधील कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि मधु चव्हाण उपस्थित होते. अंबोले हे दुसऱ्यांदा नगरसेवक असून बेस्ट समितीचे अध्यक्षही होते. एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. शिंदे हे जुने निष्ठावान शिवसैनिक आहेत. पांचाळ यांच्या पत्नीऐवजी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी भाजपाची वाट धरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टीने प्रभावित होऊन भाजपात प्रवेश करीत असल्याचे या नेत्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. तथापि, स्थानिक शिवसेना नेत्यांशी मतभेद झाल्याने ते बाहेर पडल्याचे स्पष्ट दिसते. नाना अंबोले यांच्या पत्नीस वॉर्ड २०३ मधून शिवसेनेने उमेदवारी नाकारली. पांचाळ यांच्या पत्नीऐवजी अणुशक्तीनगरमध्ये खा.राहुल शेवाळे यांच्या पत्नीला संधी देण्यात आली. त्यामुळे ते नाराज होते. मुंबईत काही नेत्यांच्या जवळच्या नातेवाइकांना भाजपाने तिकिटे दिली आहेत. याबाबत आ.आशिष शेलार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, पक्षासाठी योगदान असेल आणि स्थानिक पक्षजनांचा पाठिंबा असेल तर केवळ नेत्यांचे नातेवाइक म्हणून उमेदवारी नाकारणे योग्य नाही. (विशेष प्रतिनिधी)
आंबोले, शिंदे, पांचाळ भाजपात; मात्र ‘मातोश्री’बाबत आदर
By admin | Published: February 03, 2017 1:35 AM