नाशिक : उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाचे दान केलेले अवयव ग्रीन कॉरिडोरमुळे केवळ चार तासांत नाशिकहून पुण्याला रवाना करण्यात आले. पुण्यात गरजू रुग्णांना त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले.शनिवारी शोभा शंकर लोणारे (५३, रा. सिन्नर) यांना नाशिकच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना ऋषिकेश रुग्णालयात हलविले. मंगळवारी पहाटे लोणारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर यकृत, मूत्रपिंड, डोळे हे अवयव सुरक्षितपणे डॉक्टरांनी काढले. पावणे बारा वाजता यकृत व एक मूत्रपिंड घेऊन रुग्णवाहिका ‘ग्रीन कॉरिडोर’च्या मदतीने पुणे येथील सह्याद्री डेक्कन रुग्णालयात पोहचली. ३०० किमी अंतर सव्वा चार तासांमध्ये पूर्ण करण्यात आले. साधारणपणे या प्रवासाला पाच तास लागतात. पुणे येथे यकृत प्रत्यारोपणासाठी सह्याद्रीच्या पथकाने वैद्यक ीय प्रक्रिया सुरू केली. तर दीनानाथ व ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. सुशील नेत्र रुग्णालयाकडे गरजुंसाठी डोळे पाठविण्यात आले. पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधून पहिल्यांदाच ‘ग्रीन कॉरिडोर’ मोहिम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)
रुग्णवाहिकेने चार तासांत गाठले पुणे
By admin | Published: May 11, 2016 4:16 AM