सोलापूर: भारतीय कालमापन पद्धतीमुळेच अमेरिकेची अंतराळ मोहीम यशस्वी ठरली, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. एकादशीला यान सोडल्यामुळेच अमेरिकेला यश मिळालं. भारतीय कालमापन पद्धतीमुळेच हे शक्य झाल्याचा दावा भिडे यांनी केला. ते सोलापूरात बोलत होते. ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला अतिशय संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेची चांद्रमोहीम यशस्वी ठरली, असं भिडे म्हणाले. भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता भारतीय कालमापन पद्धतीत आहे. त्यामुळेच अमेरिकेनं चांद्रमोहीम राबवताना भारतीय कालमापन पद्धतीचा आधार घेतला, असंदेखील ते पुढे म्हणाले. येत्या नवरात्रीत शिवप्रतिष्ठानच्या वतीनं राज्यभर दुर्गामाता दौड होणार आहे. त्यासाठीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संभाजी भिडे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेवर भाष्य केलं. अमेरिकेच्या चांद्रमोहीमा, त्यातलं अपयश यावर बोलताना संभाजी भिडेंनी भारतीय कालमापन पद्धतीचं महत्त्व अमेरिकेला पटल्याचं म्हटलं. 'चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेनचे 38 प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर नासाच्या एका वैज्ञानिकानं भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला. एकादशीला उपग्रह सोडल्यास मोहीम यशस्वी होईल, असा सल्ला या वैज्ञानिकानं दिला. त्यानंतर नासाची चांद्रमोहीम फत्ते झाली, असा दावा भिडे यांनी केला. एकादशीला ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते, असंदेखील भिडे यांनी सांगितलं.
संभाजी भिडे म्हणतात, एकादशीला यान सोडल्यानंच अमेरिकेची चांद्रमोहीम यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 3:39 PM