मुंबई : अमेरिकन काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य व मूळचे भारतीय वंशाचे असलेले अमी बेरा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) पाच सदस्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. या अमेरिकन काँग्रेस सदस्यांनी महाराष्ट्रातील व्यापारविषयक संधी, सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, मुंबईतील सार्वजनिक वाहतूकप्रणाली, दहशतवाद यांसह अनेक विषयांवर राज्यपालांकडून माहिती घेतली.राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या भारत भेटीनंतर भारत व अमेरिकेतील संबंध अधिक दृढ झाले आहेत, असे राज्यपालांनी या सदस्यांना सांगितले. उभय देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नांबद्दल राज्यपालांनी शिष्टमंडळाची प्रशंसा केली. अमेरिकन काँग्रेस सदस्यांमध्ये भारताविषयी अनुकूल मत निर्माण करण्याच्या हेतूने परराष्ट्र मंत्रालयातर्फे पुरस्कृत ‘युनायटेड स्टेट्स विजिटर्स टू इंडिया प्रोग्रॅम’ या उपक्रमांतर्गत काँग्रेस सदस्यांची ही भारतभेट आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस सदस्य डेरेक किल्मर, बिली लॉन्ग (मिसुरी), ज्युआन वर्गास (कॅलिफोर्निया), ब्रेंडन बॉयल (पेन्सिल्वानिया) याचा त्यात समावेश होता. (प्रतिनिधी)
अमेरिकन काँग्रेस सदस्य - राज्यपाल भेट
By admin | Published: January 24, 2016 12:44 AM