ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १० : अमेरीकेतील फ्लोरिडा येथे डॉक्टरांनी २७४ डॉक्टरांची साखळी तयार करून एकमेकांना स्टेथोस्कोपच्या साह्याने तपासण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करून गिनेस वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद केली. नागपुरातील डॉक्टर फॉर फार्मर्सच्या चमूने शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या २९५ डॉक्टरांना एकत्र करून रविवारी सकाळी ९.३० वाजता ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर हा रेकॉर्ड मोडून जागतिक पातळीवर एक नवा रेकॉर्ड स्थापन केला आहे. रेकॉर्ड होताच डॉक्टरांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.डॉक्टर्स फॉर फार्मर्सच्या चमुतील डॉ. संजय दाचेवार, डॉ. सुरज करवाडे, डॉ. पृथा कोसे, ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल करवंदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय, श्री आयुर्वेदिक कॉलेज, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कृष्णराव पांडव आयुर्वेदिक महाविद्यालय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय, ज्युपिटर आयुर्वेदिक महाविद्यालय, लता मंगेशकर मेडिकल कॉलेज, व्हिएसपीएन डेंटल कॉलेज, काळमेघ डेंटल कॉलेजच्या डॉक्टर, प्राध्यापकांना एकत्र केले.
ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर २९५ डॉक्टर एकामागे एक लांब श्रुंखलेत उभे झाले. त्यांनी एकमेकांच्या पाठीला स्टेथोस्कोप लाऊन अमेरीकेचा रेकॉर्ड मोडला. रेकॉर्ड ब्रेक होताच डॉक्टरांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यावेळी निरीक्षक म्हणून वसंत झाडे, अंजु चोपडा, गौरी रंगनाथन, भारतीय कृष्ण विद्या विहारच्या नागलक्ष्मी उपस्थित होत्या. या रेकॉर्डर्ची इंडिया बुक रेकॉर्डला नोंद झाली असून यातील महत्वाचे पुरावे, चित्रीकरण या सर्व बाबी गिनेश वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डकडे पाठविल्यानंतर या विक्रमाची नोंद जागतिक पातळीवर होणार आहे.