भाजपची पहिली यादी रविवारी दुपारी जाहीर झाली आहे. ज्या जागांचे वाटप झाले आहे त्या जागांवर उमेदवार जाहीर करणार असे भाजपाने शनिवारीच स्पष्ट केले होते. परंतू, महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच महायुतीमध्ये सारेकाही आलबेल असून थोड्याच वेळात शिंदे गटही पहिली यादी जाहीर करणार असल्याचे समजते आहे.
महाविकास आघाडीमध्ये वाद टोकाला गेला आहे. विदर्भात काँग्रेस शिवसेनेला जागा सोडत नसल्याने ठाकरे आणि पटोलेंमध्ये खुट्ट झाले आहे. हा वाद दिल्लीपर्यंत गेला असून राज्यातील नेत्यांना दिल्लीतच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन-चार जागांसाठी मविआत तणाव निर्माण झाला आहे. यामुळे आघाडी कोणत्याही क्षणी तुटण्याची शक्यता निर्माण झाली असून महायुतीने मात्र सध्यातरी जागावाटपात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
भाजपाने रविवारी ९९ जागांवर उमेदवार जाहीर केले. या बहुतांश जागा भाजपच्या विद्यमान आमदारांच्या, तगड्या उमेदवारांच्या आहेत. तर शिंदे गटही आज पहिली यादी जाहीर करणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ही यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. भाजपाने मोठा भाऊ असल्याने आपल्या जागा सोडविल्या आहेत. परंतू, काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे अडलेले आहे. त्यातच आठवले व इतर मित्रपक्षांनीही जागा मागितल्याने काही जागांवर पेच निर्माण झालेला आहे.
परंतू, जवळपास २५० च्या वर जागांचे वाटप झाल्याने उमेदवाराला तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून याद्या जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटानंतर येत्या एक-दोन दिवसांत अजित पवारही राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे सेनेने दावा केलेला आहे. हा मतदारसंघ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा आहे. या जागेवरून माजी आमदार धनराज महाले हे इच्छुक असून त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे.