वाशिम : जमीनीमध्ये असलेल्या ८0 क्विंटल सोने बाहेर काढण्याचे अमिष दाखवून तीन युवकांनी काळे फैल वाशिम येथील आनंदराव गणपतराव उदगिरे यांना ३८ लाख ७८ हजार रूपयांनी गंडविले. ही घटना १४ मे पुर्वी घडली असुन वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये १४ मे च्या रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. प्राप्त माहितीनुसार आनंदराव गणपतराव उदगिरे (रा. काळे फैल, वाशिम) या इसमाला धनंजय गबाजी सोळंके, रामभाऊ बापजी राऊ (दोघेही रा. जांभरून नावजी, ता.जि. वाशिम), सतिष बाबाराव खंडाळकर (रा. गोंदेश्वर, वाशिम) या तिघांनी तुमच्या जमिनीमध्ये अंदाजे ८0 क्विंटल सोने आहे. ते सोने काढण्यासाठी आपल्याला विविध पुजा अर्चा करावी लागते. असे म्हटले. उदगिरे यांनी उपरोक्त तिघांवर विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्यावरून वेळोवेळी पुजा-अर्चा करण्यासाठी त्या सर्वांना वेगवेगळी रक्कम दिली. अशाप्रकारे एकुण ३८ लाख ७८ हजार रूपये या तिघांनी उदगीरे यांचेकडून उकळले. शेवटी या तिघांनी उदगिरे यांना तुमच्या जमिनीमधील गुप्तधन नाहीसे झाल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली. अशा प्रकारे धनंजय सोळंके, रामभाऊ राऊत व सतीष खंडाळकर या तिघांनी फसवणुक केली. या घटनेची उदगीरे यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असुन पोलिसांनी तिघांविरूध्द भादंविचे कलम ४२0, ३४ नुसार गुन्हा नोंदवला.
गुप्तधनाच्या अमिषापोटी ३८ लाखाने गंडविले
By admin | Published: May 15, 2014 10:30 PM