मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या, गेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून राज्य विधानसभेवर झालेल्या निवडीस आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे.सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले अमित देशमुख प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यांच्याकडून परभूत झालेले आणि अवघी ४०० मते मिळून अनामत रक्कमही जप्त झालेले अपक्ष उमेदवार अण्णाराव गोविंदराव पाटील यांनी देशमुख यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या वर्षी १८ जुलै रोजी पाटील यांची याचिका फेटाळली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चाला २८ लाख रुपयांची कमाल मर्यादा ठरलेली आहे. असे असूनही अमित देशमुख यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून, या मर्यादेहून कितीतरी जास्त खर्च करून निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब केला, असा पाटील यांचा आरोप होता, परंतु पाटील यांनी केवळ असे प्रतिपादन करण्याखेरीज आपल्या आरोपाच्या पुष्ठ्यर्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असे उच्च न्यायालयाने नमूद केले होते. या निकालाविरुद्ध पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली. तेथेही न्या. रंजन गोगोई व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने पाटील यांचे अपील फेटाळले. उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास आम्हाला कोणतेही कायदेशीर व वैध कारण दिसत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील के. के. वेणूगोपाळ व अॅड. दिलीप तूर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)
अमित देशमुख यांना कोर्टाचा दिलासा
By admin | Published: January 23, 2017 4:42 AM