मुंबई - राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीनंतर अनपेक्षीतपणे सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्र्यांची विविध जिल्ह्यांच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे अहमदनगर व नाशिकचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. तर लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे परभणी, जालना आणि बीडच्या संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे अकोल, वाशीम संपर्कमंत्रीपद, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वेडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली, यवतमाळ आणि रायगडचे संपर्कमंत्रीपद सोपविण्यात आले आहे.
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर बुलडाणा, गोंदिया तर हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई उपनगर तसेच वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना पुण्याचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांना पुण्याचे, नंदूरबारचे पालकमंत्री के.सी. पडवी यांना धुळे, पालघरचे संपर्कमंत्रीपद, कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.