Amit Gorkhe News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अलीकडील लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. विधान परिषेदची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया दिली.
सध्याचे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहायचे झाल्यास भाजपाचे १०३ आमदार आहेत. तर भाजपाचे महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असे एकूण २०१ आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात. मात्र एखादा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजप करते
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला संधी दिली, त्याबद्दल त्याचे आभार मानतो. भाजपाने दिलेल्या या संधीचा उपयोग करून सर्व सामान्य नागरिकांची सेवा नक्की करेन. भाजपाच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. खऱ्या अर्थाने वंचितांना आणि दलितांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करते. या संधीचे नक्कीच सोने करीन. दलितांसाठी आणि वंचितांसाठी काम करणार. समाजासाठी येणारा जो काही निधी असेल, तो पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
भाजपा सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष
विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांना ही उमेदवारी समर्पित करतो. भाजपा सर्व घटकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. १८ पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपाने केले आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, शेतकरी चळवळीतील, सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एक मोठी संधी भाजपाने दिली. याबद्दल निश्चित ऋणी राहीन. सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष म्हणून भाजपाकडे बघावे लागेल. या पक्षाने रामदास आठवले, माधव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना, तळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचे काम सुरुवातीपासून केले. तसेच निश्चित सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम हे भाजपाने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. त्यांनी ही उमेदवारी घोषित केली आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.