मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जंगी सभा आहे. या सभेवरून राज्यातील पुढचे वातावरण कसे असेल ते ठरण्याची शक्यता आहे. या सभेला आधी परवानगी नाही नाही म्हणत अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. यामुळे मनसेचे कार्यकर्ते जोमाने सभेच्या तयारीला लागले आहेत. अशातच या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेऔरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
राज ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते औरंगाबादकडे रवाना होतील. त्या आधीच अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. अमित औरंगाबादमध्ये एन्ट्री करत असताना एक अजब घटना घडली. त्यांचा रस्ता चुकला आणि जिथे जायचे होते, तिथे ते पोहोचू शकले नाहीत. इकडे मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी हारतुरे घेऊन जमले होते.
त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात बाबा पट्रोल पंपावर हजर होते. कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. पण अमित ठाकरे बाबा पेट्रोल पंपावर न जाता ते त्यांच्या औरंगाबाद येथील मुक्काम स्थळी पोहोचले. ही सगळी गडबड त्या जीपीएसने केल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. अमित ठाकरेंच्या कारला मुक्काम स्थळी जाण्यासाठी जीपीएसने जवळचा आणि वाहतूक कोंडी नसलेला रस्ता दाखविला. याबाबतचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.