मुंबई : लॉन्च करायला अमित काय रॉकेट आहे का? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला. याबद्दल कितीही बातम्या येत असल्या तरी बातम्यांवर नव्हे तर मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा, असे ते म्हणाले. योग्य वेळ आल्यावर त्याचा प्रवेश होईल असेही त्यांनी सांगितले. माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
मात्र असे असले तरीही मेळाव्यात पदाधिका-यांनी अमित ठाकरेंचे केलेले स्वागत पाहता आगामी काळात मनसेच्या विद्यार्थी सेनेची सूत्रे अमितकडे जातील असे चित्र दिसत आहे.
दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी मोदींची हवा ओसरल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर जे लोक नरेंद्र मोदींचे गोडवे गात होते तेच आता मोदींची खिल्ली उडवत आहेत, असे ते म्हणाले.
राज यांच्या मोदींविषयक नव्या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत मनसे भाजपाला अंगावर घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी राज यांनी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण करण्याऐवजी प्रत्यक्ष लोकांत मिसळून काम करण्याचा सल्ला कार्यकत्र्याना दिला. ते म्हणाले, सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर मोदींचे गुणगान करणारे मोदींविरोधात बोलू लागले आहेत. या वेळी त्यांनी सोशल मीडियात मोदींवरील एक विनोदही सांगितला.
चल हट, मोदी कहीं का!
पती : मैं तुम्हारे लिए साडी लाऊंगा, गहने खरीदूंगा और तुम्हें दुनिया की सैर पर ले जाऊंगा..
पत्नी : चल हट, मोदी कहीं का!
सोशल मीडियावर गाजत असलेला हा विनोद राज यांनी आपल्या खास शैलीत ऐकवताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
विधानसभेत कळेलच
नरेंद्र मोदींची लाट ओसरली म्हणणा:या राज ठाकरेंना आगामी विधानसभा निवडणुकीत खरी परिस्थिती कळेल. लोकसभेपूर्वी लाट नसल्याचा दावा केला जायचा, आता ओसरल्याच्या गप्पा आहेत. याचे उत्तर विधानसभा निवडणुकीत मिळेल.
- देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष
मोदींचे नाव घेतल्याशिवाय
नरेंद्र मोदींचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला महत्त्व मिळत नाही. त्यामुळे काहीजणांना प्रत्येकवेळी मोदींचे नाव घ्यावेच लागते.
- आशिष शेलार, मुंबई भाजपाध्यक्ष