NCP Ajit Pawar ( Marathi News ) : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शाह यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा झाली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे. अमित शाह यांचं विमानतळावर स्वागत करण्यापासून ते विविध गणपतींचं दर्शन घेण्यापर्यंत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मात्र अजित पवार हे मुंबईत असूनही शाह यांच्या भेटीसाठी न गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतु आता अमित शाह हे परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह त्यांची भेट घेतली आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुतीची नेमकी काय रणनीती असली पाहिजे, तसंच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये एकजूट कायम राखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, अमित शाह हे महाराष्ट्रातून जाण्याआधी अजित पवार यांनी त्यांची भेट घेतल्याने महायुतीतील तणावाच्या चर्चेला ब्रेक मिळणार आहे.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात नेमकं काय घडलं?
अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांचे स्वागत केले. त्यानंतर शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अमित शाह यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.तसेच लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे, फडणवीस, विनोद तावडे, केसरकर, बानकुळे, रावसाहेब दानवे आदी होते. मात्र अजित पवार कुठेच नव्हते. यावरून राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली होती.