Amit Shah News:उद्धव ठाकरेंची व्होट बँकही काँग्रेसप्रमाणे झाली आहे. जे राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जातील, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करू शकतात का? हिंमत नसेल तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच आहे, या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल करत आव्हान दिले.
अमित शाह महाराष्ट्रात असून, ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना भाजपाने उमेदवारी दिली असून, नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रॅलीत अमित शाह बोलत होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी नरेंद्र मोदीजींनी अनुच्छेद ३७० हटवले. काश्मीर कायमस्वरुपी भारतात आला. उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की, तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी ज्यांच्या पायाशी पडलात ती काँग्रेस पार्टी आणि शरद पवार काय करत होते, अशी विचारणा अमित शाह यांनी केली.
काश्मीरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते
राहुल गांधी संसदेत उभे राहिले आणि म्हणाले की, अनुच्छेद ३७० हटवू नका. त्यावर विचारले की, याचे कारण काय? त्यावर राहुल गांधी म्हणाले की, असे केल्यास काश्मीरमध्ये रक्ताची नदी वाहेल. मी तुम्हाला सांगतो की, गेल्या ५ वर्षांत तिथे रक्ताची नदी सोडा कोणाची विरोध करण्याची हिंमत झाली नाही. ही नरेंद्र मोदी सरकारची ताकद आहे. काश्मीरच्या लाल चौकात जाणे अवघड होते, तिथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते, असे अमित शाह यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की, तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे की, अनुच्छेद ३७० हटवणाऱ्याला विरोध करणारी काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे. १० वर्षांत सोनिया गांधी-मनमोहन सिंग यांची सत्ता होती. पाकिस्तानी लोक देशात घुसत होते. मनमोहनसिंग मौन राखत दिल्लीत बसत होते. त्यांना व्होट बँकेची चिंता होती. नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना खात्मा केला. पण काँग्रेसवाले याला फेक एन्काऊंटर म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांत राम मंदिराची केस जिंकली आणि राम मंदिरही बांधून दाखवले, असे अमित शाह यांनी नमूद केले.