शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदेंसोबत कोण कोण आहेत, याची चर्चा सुरु असताना दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी भाजपासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला तरी तो भाजप स्वीकारणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहोचले होते. यामुळे दिल्लीतून शिंदे यांच्याशी संपर्क साधला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस नड्डांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीतील घडामोडींकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या हातातून आता संधी हुकली आहे. आता मुंबईत काहीही राहिलेले नाही. सर्व सुत्रे आता सुरत आणि दिल्लीतून सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दादा भुसे मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतू माजी मंत्री संजय राठोड देखील सेंट रेजीस हॉटेलमध्येच होते. याच हॉटेलमध्ये शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांना ठेवले होते. परंतू या हॉटेलमध्ये १४ आमदार होते. या आमदारांसोबत प्रत्येकी दोन दोन शिवसैनिक ठेवण्यात आले आहेत. मध्यरात्रीनंतर २ -३ वाजता या कट्टर शिवसैनिकांना वर्षावर बोलविण्यात आले होते. यामुळे शिंदे यांनी बंड केल्याचे ठाकरेंना समजले होते.