Amit Shah Maharashtra Politics: गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घटना घडल्या आहेत. आधी शिवसेनेत फुट पडून दोन गट तयार झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झाली. या पक्ष फुटीवरुन विरोधक सतत भाजपवर टीका करत असतात. भाजपनेच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतो. आता विरोधकांच्या या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी गृहमंत्र्यांना विचारण्यात आले की, महाराष्ट्रात भाजपने अनेक पक्ष फोडून सत्ता स्थापन केली. पण राजकीय विश्लेषकांच्या मते सहानुभूती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांकडे आहे. महाराष्ट्रात तुमची युती चांगली कामगिरी करेल, यावर तुम्हाला किती विश्वास आहे? याला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, 'महाराष्ट्रात भाजपने एकही पक्ष फोडला नाही. या पक्षफुटीचे कारण पुत्रप्रेम आहे.'
'आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. पण, आदित्य ठाकरेंना नेता म्हणून स्वीकारण्यास तयार नसलेला मोठा गट बाहेर पडला. बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेनेत काम करणाऱ्या लोकांनी उद्धव ठाकरेंना नेता म्हणून स्वीकारले, पण आता त्यांना आदित्य ठाकरेंचे नेतृत्व मान्य नव्हते. 'शरद पवारांनाही आपल्या मुलीला प्रमुख बनवायचे होते. पण, पक्षातील अनेकांना हे पटले नाही आणि त्यामुळेच ते वेगळे झाले. आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. पुत्रप्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला तडा गेला आहे,' असं शाह यावेळी म्हणाले.