मुंबई - मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुल येथील सभेतून कलम 370 च्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अमित शहा यांची महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा होती. शहा यांनी आपल्या 34 मिनिटांच्या भाषणात तब्बल 51 वेळा 370 चा उल्लेख केला. त्यामुळे 370 मुद्द्यावरूनच विधानसभेचा प्रचार करायचं असे भाजपचे ठरले असल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे.
शहा यांनी कलम 370 हटवल्याचा विरोध करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत जागा दाखवून देण्याचे आव्हान यावेळी केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप 370 मुद्द्यावरूनच विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अमित शहा यांनी आपल्या संपूर्ण भाषणात कलम 370 चा 51 वेळा तर कलम 35 ए याचा 15 वेळा उल्लेख केला असल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तर आता विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दयांपेक्षा काश्मीरचा मुद्दा गाजणार असल्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यानंतर झालेल्या भाजपच्या आजच्या पहिल्याचा सभेत, शहा यांनी आपले अर्ध्यापेक्षा अधिक भाषण कलम 370 च्या मुद्द्यावर केले.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचा कलम 370 हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत एयर स्ट्राइकच्या मुद्द्याच्या भाजपला मोठ्याप्रमाणावर फायदा झाला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कलम 370 चा मुद्दा भाजप हाताळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.