ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - भाजपाध्यक्ष अमित शहा तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर असून महापालिकेने त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले पोस्टर्स हटवले आहेत. शुक्रवारी महापालिकेने कारवाई करत सर्व पोस्टर्स हटवले आहेत. विशेष म्हणजे उद्या म्हणजेज रविवारी अमित शहा शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. मात्र ही भेट होण्याआधीच महापालिकेने पोस्टर्स हटवल्याने भाजपाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्याने जाणुनबुजून पोस्टर्स हटवल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहे.
भाजपा आणि शिवेसनामध्ये आधीच शीतयुद्द सुरु असताना अमित शहा यांचे पोस्टर्स हटवल्याने त्याला हवा मिळण्याची शक्यता आहे. अमित शहा मुंबई दौ-यावर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले होते. मात्र महापालिकेने हे पोस्टर्स हटवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन सध्या राजकीय भेटीगाठी सुरु आहेत. अमित शहा आणि राजनाथ सिंह सर्व पक्षप्रमुखांची भेट घेत आहेत. याच संदर्भात अमित शहा रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शाह यांचे बरेचसे कार्यक्रम सह्याद्री अतिथी गृह आणि मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान येथे होणार आहेत. महापालिकेने कारवाई करत याच परिसरातील फलक हटवल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं कळत आहे.
शिवसेनेने मात्र याबद्दल आयुक्त किंवा संबंधित अधिकारी अधिक सांगू शकतील, असं सांगत चेंडू आयुक्तांच्या कोर्टात टाकला आहे.