मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ सप्टेंबरला मुंबईत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात त्यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या शक्यतेला पूर्णविराम दिला.
फडणवीस म्हणाले की, अमित शाह हे दर गणेशोत्सवात मुंबईला येतात. काही गणपतींचे दर्शन घेतात. यावेळी ते लालबागचा राजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसेच माझ्याकडील गणपतींचे दर्शन घेतील. भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. राज व शाह भेटीचा कोणताही कार्यक्रम नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना खोचक सल्लासध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन आहे. कामाला कामाने उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा असे होते. पंतप्रधान मोदी यांनी ज्याप्रकारे कामे केली आहेत, त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत. मोदींनी विकासाची एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी रेष ओढण्याचे काम विरोधकांनी करावे, असा खोचक सल्ला फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.