मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात काँग्रेस-राष्ट्रवादी,काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. विशेष म्हणजे विरोधीपक्षातून येणाऱ्या आयारामांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासने मिळत आहे. मात्र आता याच आयरामांच्या उमेदवारीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. भाजपमध्ये आजवर आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारीविषयी कोणतेही आश्वासने देऊ नका अशा सक्त सूचना, मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील विरोधीपक्षातून भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू आहे. विशेष म्हणजे यातील अनेकांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन भाजपप्रवेश करून घेण्यात आला आहे. मात्र भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना आयरामांच्या उमेदवारीवरून सक्त सूचना दिल्या आहेत. उमेदवारी कुणाला द्यावी,यासाठी भाजपने सर्वेक्षणाद्वारे जनतेची मते जाणून घेतली आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी कुणालाही उमेदवारीची हामी देऊ नये असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे आता भाजपमधील आयरामांच्या उमेदवारीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
दिल्लीत मंगळवारी अमिता शहा आणि नड्डा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र,झारखंड,हरियाणा आणि दिल्ली या चारही राज्यांच्या प्रभारींची व प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्रात भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवर अमित शहा आणि नड्डा यांनी राज्याच्या नेत्यांना विशेष सूचना दिल्या. यापुढे केंद्रीय नेतृत्वाच्या परवानगीशिवाय इतर पक्षातील एकाही नेत्याला भाजपात सामील करून घेऊ नका. तसेच आतापर्यंत आयात केलेल्या कुणालाही उमेदवारीविषयी आश्वासन देऊ नका अशा सुद्धा सूचना देण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजपप्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या नेत्यांसाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रीय समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे.