लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. गृहखात्याच्या अंतर्गत असलेली एसपीजी या सर्वांचे नियंत्रण करत असते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटींबाबत आता त्यांनीच उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मोदी यांच्या दौऱ्यातील त्रुटी राहिल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.
टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था, जीवनाश्यक वस्तूंचे वाढलेले दर, भाजपशासित राज्यातील दलितांवरील अत्याचार यामुळे देशातील जनतेत भाजपविरोधात प्रचंड संताप आहे. तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे पंजाबमधील त्यांच्या सभेला ५०० लोकंही आली नाहीत. यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान हवाई दौरा सोडून रस्ते मार्गे जायला निघाले होते. मुळात त्यांना सभास्थळी जायचेच नव्हते. त्यामुळे त्यांनी नौटंकी केली. ही बाब पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणली असून पंजाब सरकारच्या चौकशीतून दूध का दूध, पानी का पानी होईल आणि पंतप्रधान आणि भाजपचा खरा चेहरा समोर येईल, असे ते म्हणाले.
‘जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी जे काही घडले ते अत्यंत गंभीर होते. या घटनेचा भाजप निषेध करीत आहे.
सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार ‘तोंड उघडायला लावू नका’चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल.- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष