मुंबई - सध्या राज्यामध्ये ड्रग्ज आणि ड्रग्स रॅकेडचा मुद्दा गाजत आहे, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. ड्रग्ज रॅकेटप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'टास्क फोर्स' निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
देशाच्या केंद्रीय यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतात त्यापलीकडे जाऊन ही 'टास्क फोर्स' यंत्रणा तयार करून तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या या ड्रग्ज रॅकेट माफियांवर कारवाई व्हायला हवी असं स्पष्ट मतही उमेश पाटील यांनी व्यक्त केलं.
कुणाच्या असण्याने अशा घटना घडतात असे होत नाही. अजितदादा पवार यांच्या कामाची कार्यशैली संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. अजितदादा पवार चुकीच्या कामाला कधीही पाठिशी घालत नाहीत. मागील ३५ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा हा स्वभाव सर्वांना माहीत आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. जगभरातून आणि देशभरातील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत असतात. शिक्षणाच्यादृष्टीने चांगल्या गोष्टी सांगता येत असल्या तरी त्यासोबत काही अपप्रवृत्ती देखील इथे घुसखोरी करून आलेल्या आहेत. ड्रग्जचा जो विळखा आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. तरुणपिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याने हे रॅकेट पुण्यापर्यंत मर्यादित नाही, राज्यापुरतं नाही, देशभरापुरतं नाही तर ते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे असेही उमेश पाटील म्हणाले.
त्यामुळे विरोधकांनी ड्रग्ज प्रकरणात राजकारण न करता या प्रश्नाकडे संवेदनशीलपणाने बघण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही उमेश पाटील यांनी यावेळी केले.